संस्थेविषयी…

स्वातंत्र्याला ६० हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, संरक्षण देत, आर्थिक विकास, इत्यादी क्षेत्रात आमूलाग्र विकास होताना या ६० वर्षात पाहिला आहे. यातही काळजीची बाब अशी कि संपूर्ण देशात दरवर्षी ४ लाख तर महाराष्ट्रात ७५ हजार बालके कुपोषणाची शिकार होतात. वनवासी क्षेत्रातील आरोग्याची स्थिती तर अगदीच दयनीय आहे. या क्षेत्रात आरोग्य सेवांची अपूर्णता, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, आरोग्याबाबत जागरूकतेची उणीव अशी कारणे असली तरी कुपोषणाची समस्या सोडवायला केवळ सरकार नव्हे तर अनेक स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

 

हाच विषय केंद्रस्थानी घेऊन एप्रिल २००३ पासून शबरी सेवा समितीच्या कार्यास प्रारंभ झाला. वनवासी क्षेत्रातील महिला व बालकांचे आरोग्य ह्या विषयावर लक्ष केंद्रित केले. सप्टेंबर २००३ मध्ये संस्थेची धर्मादाय आयुक्त मुंबई येथे नोंदणी झाली. तेंव्हापासून महाराष्ट्रातील जव्हार, मोखाडा, कर्जत, नंदुरबार अशा तालुक्यांतील दुर्लक्षित गावांमध्ये जाऊन तेथे विकासाचे प्रयत्न चालू केले. महिला व लहान बालकांना पोषक आहार देण्यास सुरुवात केली. पोषक आहार, मोफत आरोग्य तपासणी, गरोदर स्त्रियांची सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार, मार्गदर्शन, असे बरेच आरोग्य विषयक उपक्रम हाताळले गेले. 

२००३ मध्ये सुरु झालेल्या या कार्यांत अन उपक्रमांत उत्तरोत्तर भरच पडत राहिली.

 

कर्जत तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्यावर त्याठिकाणी विविध शैक्षणिक उपक्रम सुरु झाले. बालवाड्या, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाकरिता विविध उपक्रम; जसे चित्रकला, वक्तृत्व, निबंध,पाठांतर स्पर्धा, पुस्तक हंडी कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेत वाचनालय सुरु करणे, किशोरी विकासासाठी युवती शिबिरे अश्या कार्यक्रमांची साखळीच निर्माण झाली.

जव्हार, मुरबाड,शहापूर तालुक्यातही कार्य सुरु झाले. मुरबाड-शहापूर मध्ये मेडिकल कॅम्प, सामूहिक डोहाळे जेवणाचे कार्यक्रम होऊ लागलेत. जव्हार तालुक्यातही बालवाड्या, अभ्यासिका, शालेय साहित्य वाटप, विविध शैक्षणिक स्पर्धा तसेच फलोद्यान विकासांतर्गत आंबा, काळीज,फणस अश्या झाडांचे वाटप, रोजगाराभिमुख व्यवसाय मार्गदर्शन शिबीर असे विविध उपक्रम नियमितपणे सुरु आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-धडगाव-तळोदे अश्या अत्यंत दुर्गम भागातील कुपोषित व आजारी मुलांना शहादे येथील डॉ. कुलकर्णी हॉस्पिटल मध्ये दाखल करून त्यांना औषधोपचार करणे हे मूलभूत व गरजेचे कार्य गेली ७-८ वर्षे अत्यंत नियमितपणे सुरु आहे. डॉ. अलकाताई कुलकर्णी यांच्या बहुमोल सहकार्यामुळे हे काम सातत्याने सुरु आहे. मृत्यूच्या दिशेने जाणाऱ्या हजारो मुलांचे प्राण आज आपल्या अथक प्रयत्नांनी आपण वाचवले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातही शेती विकास व फलोद्यान विकासाचे काम सातत्याने सुरु असल्याने शेतकऱ्यांचे रोजगारासाठीचे स्थलांतर आपण अंशतः थांबवू शकलो आहोत. 

संस्थेच्या कर्जत तालुक्यातील कशेळे केंद्रात १५ विध्यार्थी आणि ५ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

हे सर्व काम करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात १८ पूर्ण वेळ कार्यकर्ते काम करतात. संस्थेच्या कामासाठी प्रत्यक्ष काम व आर्थिक पाठबळ उभे करणे यासाठी शहरांतही असंख्य कार्यकर्ते,हितचिंतक आणि देणगीदार आहेत.

तसेच पुस्तक-वह्या वाटप, शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप विविध स्पर्धा यासारखे शैक्षणिक उपक्रम हाताळले आहेत. कर्जत येथेच जून २००८ साली संस्थेचे उपकेंद्र कशेळे येथे चालू केले. गेल्या वर्षात असंख्य कार्यक्रम आणि उपक्रम संस्थेच्या माध्यमातून संपन्न झाले. शबरी सेवा समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक हे कार्यक्रम यशस्वी केले आहेत. संस्थेला असंख्य देणगीदार भरभरून अर्थसहाय्य केले. करीत असलेले कार्य हि परमेश्वराची साधना आहे यावर आम्हा कार्यकर्त्यांचा दृढविश्वास आहे.

 

Translate »